अक्कलकोट – हिंदी, मराठी व कन्नड भाषेतील सुरेल देशभक्तीची गाणी, भक्ती गीते, बेहतरीन डान्स त्यातून वाद्याचा अविष्कार यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कलाकृतीचा रंग भरला होता. कलाकारांच्या गायन, नृत्य, वादन कार्यक्रमास वागदरीतील रसिकांनी मनमुराद दाद दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक देखील केले.
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर वागदरी येथे सुरू आहे. शिबिराच्या निमित्ताने नागरिकांचे प्रबोधन व्हावे म्हणून स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी रंगमंच पूजा कमलाकर सोनकांबळे यांचे हस्ते झाले. यावेळी रमेश मंगाणे, परमेश्वर शेळके, शाम बाबर, महादेव सोनकवडे, बापूसाहेब चव्हाण, ज्योती सावंत उपस्थित होते.
स्वयंसेवकांनी कार्यक्रमां मधून नृत्य, संगीत लोककला,नाटक, काव्यवाचन, भारुड, पोवाडा यांसारख्या विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे कार्य देखील केले. सांस्कृतिक कार्यक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून समाजप्रबोधनाचेही प्रभावी साधन आहे. अनेक वेळा सामाजिक समस्या, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारखे विषय कलात्मक पद्धतीने स्वयंसेवकांनी मांडले यामुळे प्रेक्षकांवर सकारात्मक परिणाम झाला, त्यातून विचारप्रवृत्तीला चालना मिळाली.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी असा संस्कृतिक कार्यक्रम उपयुक्त ठरते. आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करण्यास अशा उपक्रमांची मदत होते. असे यावेळी प्रमुख ग्रामस्थ संयोजक बापूजी चव्हाण यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रम समाजाला एकत्र बांधणारे, परंपरा जपणारे आणि नव्या विचारांना प्रोत्साहन देणारे असतात. सामाजिक सलोखा वाढवणे, विविधतेत एकता साधणे हा कार्यक्रमाचा उद्देश असतो असे शेवटी कार्यक्रम अधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य ग्रामस्थ, महिला, बालगोपाळ उपस्थित होते.सूत्रसंचलन समर्थ पवार यांनी केले उपस्थितांचे आभार कु प्रणाली थोरात यांनी मानले.
वागदरी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात नृत्य अदाकारी सादर करताना स्वयंसेविका.






















