बार्शी – चाटे शिक्षण समूहाच्यावतीने Beyond the Study या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात भास्कराचार्य टॅलेंट सर्च परीक्षा (BTS), चाटे टॅलेंट सर्च परीक्षा (CTS) व दहावीच्या विशेष गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
चाटे टॅलेंट सर्च परीक्षा (CTS) ही परीक्षा दरवर्षी चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग आयोजित करत असते. चाटे शिक्षण समूह बार्शी शाखेसाठी १० लाख ५७ हजार रुपयांच्या स्कॉलरशिपचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास चौथी ते दहावीमधील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन प्रा. सर्जेराव राऊत (शैक्षणिक विभाग प्रमुख) यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद करत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी कशी करावी, याबाबत अत्यंत मोलाचे व मार्गदर्शक विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये परीक्षांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
यावेळी प्रा. प्रदीप भोसले यांनी अभ्यास कसा करावा, वेळेचे नियोजन, सातत्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या सोप्या आणि प्रभावी मांडणीला विद्यार्थ्यांकडून विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सर्जेराव राऊत, प्रा. प्रदीप भोसले, प्रा. पाटील सर तसेच पालक प्रतिनिधी जयराज निकम उपस्थित होते.प्रस्ताविक चाटे शिक्षण समूह बार्शी शाखेचे शाखा व्यवस्थापन पांडुरंग घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन स्वाती लोखंडे यांनी केले. सूत्रसंचलन शैलजा लुंगारे व पूजा कोरफळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चाटे शिक्षण समूहाच्या टिचिंग नॉन-टिचिंग टीमने उत्कृष्ट नियोजन व परिश्रम घेतले.
Beyond the Study या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरतेच नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या दिशेने योग्य मार्गदर्शन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






















