सोलापूर : विधी क्षेत्रात दीर्घकाळ सातत्यपूर्ण, प्रामाणिक, निर्भीड व समाजाभिमुख सेवा देणाऱ्या ज्येष्ठ अधिवक्त्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला विधिगंध पुरस्कार वितरण सोहळा हा दि. 09/01/2026 रोजी सोलापुरातील रंगभवन सभागृहात अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम विधिगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, अॅड. संतोष न्हावकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला होता. या सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे न्यायव्यवस्थेला बळकट करण्यासाठी, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि विधी क्षेत्रात नैतिकतेचे उच्च मूल्य जपण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या अधिवक्त्यांच्या कार्याचा गौरव करणे, हा होता.
यंदाचे विधिगंध पुरस्कार कै. ए. डी. ठोकडे स्मृती विधिगंध पुरस्कार हा बार्शी येथील ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. सुभाष शंकरराव जाधवर यांना तर ए. तु. माने स्मृती विधिगंध पुरस्कार हा पंढरपूर येथील ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. भारत अनंतराव बहिरट यांना तसेच कै. तात्यासाहेब नेलेकर स्मृती विधिगंध पुरस्कार हा सांगोला येथील ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. जालिंदर अप्पासाहेब ढेरे यांना प्रदान करण्यात आला. या तिन्ही पुरस्कारार्थींनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत कायद्याची सेवा करताना न्याय, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी अनेक गरजू, वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अनिस सहस्त्रबुद्धे (सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायर) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून फौजदारी क्षेत्रातील जेष्ठ वकील अॅड. धनंजय माने व सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जेष्ठ वकील अॅड. व्ही. एस. आळंगे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे, खजिनदार अॅड. अरविंद देडे, सहसचिवा अॅड. मीरा प्रसाद व विधिगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. संतोष विठ्ठल न्हावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
युवा वकिलांना नैतिकता, संयम, अभ्यास व प्रामाणिकपणा या मूल्यांचे पालन करण्याचा संदेश दिला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधिगंध साप्ताहिकाच्या नवीन अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विधी क्षेत्रातील घडामोडी, न्यायालयीन प्रक्रिया, कायद्यातील बदल तसेच सामाजिक प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण लेखनामुळे हे साप्ताहिक वाचकप्रिय ठरत आहे. नव्या अंकामुळे या सोहळ्याला वैचारिक अधिष्ठान लाभले.
सदर कार्यक्रमात विधिगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेची माहिती देऊन मान्यवरांच्या हस्ते टीशर्ट चे अनावरण करण्यात आले, व स्पर्धेचे उदघाटन देखील करण्यात आले सदर स्पर्धे मध्ये विविध स्मरणार्थ पारितोषिकांची घोषणाही यावेळी करण्यात आली.



















