सोलापूर – प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आणि भाजपच्या उमेदवारांचा जनता या निवडणुकीत निश्चितपणे पराभव करेल, असा विश्वास व्यक्त करून आपण कामाचा माणूस असल्याने लोक आपलाच विजय करतील अशी आपल्याला खात्री असल्याचा दावा
शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी महापौर मनोहर सपाटे यांनी व्यक्त केला.
प्रभाग सहा मधील शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे, रेखा लहू गायकवाड, कीर्ती शिंदे व अंकुश राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीद्वारे देगाव परिसरातील बसवेश्वरनगर तांडा, देगाव, कोयनानगर,थोबडे वस्ती, दमाणीनगर भागात भव्य रॅली काढून मतदारांनी प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले. त्यावेळी सपाटे बोलते.
यावेळी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत माजी महापौर सपाटे म्हणाले की, कष्ट, प्रामाणिकपणा आणि सात्विकतेच्या विचारातून एकत्र आलेले आपले पॅनल आहे. आमच्यासमोर असलेली शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार नैतिकतेपासून दूर असून त्यांना संविधान मान्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.
दादागिरी, गुंडगिरी व दहशतीच्या जोरावर लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या प्रभागात सत्तेचा गैरवापर झाला असून आता जनता अशा नगरसेवकांना नाकारण्याच्या मनस्थितीत आहे.”पक्षाकडून तिकीट नाकारले असतानाही शिवसेना ठाकरे गटाकडून आम्हाला आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून आम्ही घराघरांत जाऊन प्रचार करत असून आतापर्यंत सुमारे पंचवीस वेळा मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाहीमध्ये दादागिरी चालते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रेल्वे बोगदा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. तसेच प्रभागातील मराठा व बहुजन समाजाशी संवाद साधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. १५ तारखेला होणाऱ्या मतदानातून जनता दादागिरी, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला नकार देईल, असा विश्वास व्यक्त करत संविधान, लोकशाही आणि पारदर्शक कारभारासाठी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन मनोहर सपाटे यांनी केले.
दरम्यान, यावेळी दमाणीनगर येथे झालेल्या सभेत अपक्ष उमेदवार रेखा गायकवाड, कीर्ती शिंदे व अंकुश राठोड यांनी देखील मनोगत व्यक्त करून सपाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून आपल्याला भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. या रॅलीमध्ये प्रभागातील नागरिक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

























