सोलापूर – महानगरपालिका सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २०२७ निवडणुकीचे मतदान गुरुवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून शहरातील विविध मतदान केंद्रांवर पार पाडले गेले. दुपारपर्यंत विविध मतदान केंद्रांवर मतदारांची म्हणावी तशी गर्दी नव्हती. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ३३ टक्के इतकाच राहिला होता. शहरातील प्रमुख संवेदनशील तसेच हद्दवाढ आणि जुळे सोलापूर येथील मतदान केंद्रामध्ये मतदारांची संख्या कमी दर केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची आणि पोलिंग एजंटची गर्दी दिसून आली. मतदान केंद्रांत मतदारांसह मतदान प्रतिनिधी आणि त्यांचे इतर कार्यकर्त्यांची वर्दळ सुरूच होती. वयोवृद्ध मतदारांना रिक्षातून घेऊन आणण्यापासून ते त्यांना घरी सोडण्यापर्यंतचे कामकाज या कार्यकर्त्यांनी केले. मात्र यादरम्यान मतदान प्रतिनिधी आणि इतर कार्यकर्त्यांचा वावर मतदान केंद्रात वाढल्याने पोलिसांची थोडीशी ढिलाई दिसून आली.
सोलापूर शहराच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ उतार पहावयास मिळाले. राजकीय वैर वैयक्तिक तंट्यावर येऊन थांबले आहे. यामुळे शहराचे वातावरण ढवळून निघत आहे. दलबदलू नेत्यांमुळे मतदारांमध्ये निराशा दिसून आली. तर अशातच इ.व्ही.एम. मशीनमध्ये यांत्रिक बिघाड झाल्याने मतदानास उशीर झाला. यामुळे मतदार आणि उमेदवार हे दोघेही देखील वैतागले होते. चिन्ह आणि मशीनवरील बटन यामध्ये मतदारांना संभ्रमावस्था निर्माण झाली. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना मशीन बिघाड करण्यास विलंब लागल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ज्येष्ठ नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारनंतर मतदार मतदान देण्यासाठी हळूहळू बाहेर पडू लागले. त्यामुळे उमेदवारांच्या जिवात जीव आला. मात्र यंदाचा मतदान नागरिकांनी हातात घेतल्याचे पहावयास मिळाले.
चौकट
क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणावर
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकूणच परिस्थितीचा विचार करता, यावेळी धक्कादायक निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट
निकालाबाबत उत्सुकता शिगेला
सर्वेक्षणांनुसार भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आघाडीवर असल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकावर कोणता पक्ष येईल, याबाबत सध्या स्पष्टता नसून मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. मतदारांचा कल नेमका कुठल्या दिशेने जाणार, हे सांगणे कठीण झाले असून निवडणूक निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मतदारांना पैशांचे प्रलोभन अन् गोंधळ
मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदाना दिवशी दुपारी मतदारांना पैशांचे प्रलोभन देण्याच्या घटना घडल्या. प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवारांकडून पैसे वाटप करण्यात आल्याची माहिती मिळताच काँग्रेस उमेदवार कुणाल देवीदास गायकवाड यांनी स्वतः उमेदवाराच्या मुलाला पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले. तर मतदानादिवशी दुपारच्या सुमारास पोलिस मुख्यालय येथे पैसे वाटप करताना काही युवकांना पकडण्यात आल्याच्या घटना ऐकण्यास मिळाल्या. येथे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. संवेदनशील चौपाड परिसरात देखील जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.






















