वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज भरणा करण्यासाठी काही दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या वतीने थकबाकी वसुलीसाठी कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या विरोधात मंगळवारी आमदार राजू पाटील नवघरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन ठीया आंदोलन करून कार्यालयास कुलूप टाकून कार्यालयात शेतकऱ्यांचे पशुधन बांधण्याचा इशारा दिला.
वसमत तालुक्यात महावितरण च्या वतीने थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्याचे कृषी पंपाचे कनेक्शन तोडले जात आहेत. थकबाकीसाठी डीपी बंद केल्या जात आहेत.
आमदार राजू भैय्या नवघरे यांनी वसमत तालुक्यातील सक्तीची वसुलीमोहीम थांबवावी अशी मागणी लावून धरलेली आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका त्यांना त्रास देऊ नका किमान थकबाकीचे हप्ते तरी पडून द्या पण वीज पुरवठा खंडित करू नका असे आवाहन त्यांनी केले. मात्र वीज वितरण अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही वरूनच सूचना असल्यामुळे मोहीम सुरू असल्याचे सांगितले जाते.
मनमानी वसुली मोहिमेच्या विरोधात वारंवार विनंती निवेदनदेऊन शेतकऱ्यांची परिस्थिती व वास्तव परिस्थिती मांडण्याचा आमदार नवघरे यांनी प्रयत्न केलेला आहे.
पाठपुरावा करून ही महावितरण शेतकऱ्यांची विजतोड करणे थांबवत नसल्यामुळे तालुक्यात असंतोषाचे वातावरण आहे. या प्रश्ना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना मंगळवारी आमदार नवघरे यांनी वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.