गेल्या १० वर्षांपूर्वी करकंब पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यामध्ये रूपांतर झाले आहे.त्यावेळी पोलीस चौकीच्या जुन्या इमारतीची तात्पुरती दुरुस्ती करून त्या इमारतीमध्येच कामकाज सुरू होते.दोन वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीस मंजुरी मिळाल्याने नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले हे बांधकाम पूर्ण होऊन ७ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उदघाटनाचा मुहूर्त सापडत नाही.केवळ उद्घाटनाच्या अभावी या इमारतीचा वापर करण्यात येत नाही.
या नवीन पोलीस ठाण्याचे ४००० स्क्वेअर फुटाचे सुसज्ज बांधकाम तयार आहे.यात प्रमुख अधिकाऱ्यांची केबिन व इतर १५ खोल्या पोलीस प्रशासनाच्या कामकाजासाठी बांधल्या आहेत.त्याचप्रमाणे ३ जेलरुम असल्याने पोलीस कोठडीतील आरोपींना पंढरपूर येथील पोलीस कोठडीत घेऊन जावे लागणार नसल्याने पोलीस दलाचे मनुष्यबळ,सुरक्षितता व वेळेचीही बचत होणार आहे.
गेल्या ७ महिन्यांपासून सदर इमारतीचे उद्घाटन होणार असल्याची फक्त चर्चाच होत आहे.
कोट्यावधी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या या नवीन इमारतीचे उद्घाटन करून लौकरात लौकर पोलीस प्रशासनाचे कामकाज या इमारतीमधून सुरू करावे अशा प्रकारची मागणी करकंब पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.