मंगळवेढा – शहरात अवजड वाहनांची रीघ सुरु असल्याने नागरिकांना व शालेय मुलांना जीव मुठीत घेवून रस्ते ओलांडावे लागत आहेत. दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीसांनी पंढरपूर बायपास रोड व मरवडे रोड येथे जड वाहनास प्रवेश बंद असे फलक लावूनही बिंधास्तपणे वाहन चालक अवजड वाहने शहरात आणत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून नगरपालिका प्रशासनाने अवजड वाहतूक थांबविण्यासाठी नो एन्ट्री आदेशाची प्रत पोलीस प्रशासनास देणे गरजेचे आहे.
मंगळवेढा शहरातून रात्रंदिवस अवजड वाहने तसेच ऊसाने भरलेली डबल ट्रेलरची वाहने बिंधास्तपणे दिवसरात्र सुरु आहेत. दामाजी चौक शहराचे ह्रदय म्हणून ओळखले जाते. येथेच माध्यमिक प्रशाला व ज्यु. कॉलेज तसेच काही अंतरावर पंचायत समिती कार्यालय व बसस्थानक असल्याने या चौकात मोठी गर्दी नेहमीच असते. यापुर्वी जवळपास अवजड वाहनामुळे डझनभर लोकांचा जीव गेला असतानाही नगरपालिका प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे. अजून किती लोकांचा जीव जाण्याची नगरपालिका वाट पाहते असा प्रश्नही सुज्ञ नागरिक व जेष्ठ नागरिक प्रशासनास करीत आहेत. पंढरपूर बायपास व मरवडे रोड येथे अवजड वाहने शहरात येवू नये म्हणून कमान बसविण्यात आली होती. मात्र ती वाहनांनी पाडल्याने आता वाहनांचा मुक्तसंचार शहरामधून सुरु आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीवरुन पंढरपूर रोड व मरवडे रोड या दोन ठिकाणी अवजड वाहनास नो एन्ट्री असे फलक लावलेले आहेत मात्र बाहेरच्या राज्यातून आलेले वाहन चालक पोलीसांना नो एन्ट्री आदेशाची प्रतची मागणी करीत आहेत.
नगरपालिकेच्या हद्दीतून हा रस्ता गेल्याने ही सर्व जबाबदारी नगरपालिकेची असून नगरपालिकेने नो एन्ट्री आदेशाची प्रत पोलीस प्रशासनास देण्याची गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने या बाबत नगरपालिकेला पत्र व्यवहार करुनही नगरपालिका तोंडावर बोट हाताच घडी या अवस्थेत असल्याने नागरिकांना मात्र जीव मुठीत धरुन दामाजी चौकातून रस्ते ओलांडावे लागत आहेत. जिल्हाधिकारी यांनी या कामी गांभीर्यपुर्वक लक्ष घालून नगरपालिका प्रशासनाचे कान टोचावेत अशी मागणी या निमित्ताने शहरवासीयामधून पुढे येत आहे.
पोलीसांनी जवळपास आत्तापर्यंत 15 ते 16 बॅरीकेटस लावली होती. मात्र ही बॅरीकेटस वाहनचालकांनी मोडतोड केल्याने याचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. शहरालगत असलेला बायपास रोड मध्यंतरीच्या पावसामुळे अत्यंत खराब झाला आहे. मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे याच्या त्रासाला कंटाळून वाहन चालक शहरातून वाहन नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासनाने दि.16 डिसेंबर रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना लिखीत पत्र देवून शहरात नो एन्ट्री बाबतच्या अधीसुचनेची प्रत मिळणेबाबत पत्रव्यवहार करुन जवळपास तब्बल एक महिना उलटूनही नगरपालिका चिडीचूपच आहे.
दि.26/5/2025 रोजी प्रांत कार्यालयात सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत शहरातून होणारी अवजड वाहतूक रोखण्याकरिता मिटींग झाली होती. या मिटींमध्ये 3.5 मिटर उंचीची कमान बसविणे,तसेच मरवडे व पंढरपूर रोडवर 10 बाय 10 फुटाचे रिफ्लेक्टर नो एन्ट्रीचे बोर्ड बसविणे,गुगल व इतर मॅपवर रस्तेबाबत बदल करुन घेणे आदी निर्णय सदरच्या मिटींगमध्ये झाले होते. या बैठकीत घेतलेले निर्णय होवून तब्बल आठ महिन्याचा कालावधी लोटूनही नगरपालिका प्रशासनाचा अद्यापही या घटनेचे गांभीर्य न समजल्याने शहरातून वाहतूक बिंधास्तपणे सुरु आहे. आता तरी नगरपालिका प्रशासन दखल घेवून पुढील कार्यवाही करणार का? असा संतापजनक सवाल शहरवासीयांनी नगरपालिका प्रशासनास केला आहे.
फोटो ओळी
शहरात अवजड वाहने येवू नयेत यासाठी पंढरपूर रोडवर नो एन्ट्रीचे फलक लावल्याचे छायाचित्रात दिसत आहेत. (छाया-प्रथमेश राजे नागणे




















