सोलापूर – वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मद्रे शिवारात सुरू असलेला विनापरवाना बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत वळसंग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ५४ लाख ९ हजार ६५० रुपयांचा बनावट दारू व साहित्याचा साठा जप्त करण्यात आला असून राजु उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर रा. मद्रे, ता. दक्षिण सोलापूर यास अटक करण्यात आली आहे.
दि. २४ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ पाहणी व पेट्रोलिंग करत असताना वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांना मद्रे ते आहेरवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत संशयास्पदरीत्या उभा असलेला एक आयशर टेम्पो दिसून आला. पत्र्याच्या कंपाउंडच्या आडोशाला हा टेम्पो थांबलेला असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत पाहणी केली असता, टेम्पो जवळील ३ ते ४ इसम पळून गेले. लगत असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनची तपासणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना आढळून आला.
या ठिकाणी स्वयंचलित ४ मशिन्स, कच्च्या रसायनांचे २५० लिटर क्षमतेचे १२२ बॅरल, रिकाम्या बाटल्यांचे बॉक्स, झाकणांचे बॉक्स, तसेच टँगो पंच रॉकेट, भिंगरी देशी दारू, कोंकण प्रिमियम नं. 1 (९० मि.ली.) या नावाने तयार बनावट देशी दारू सापडली.
सदर कारखाना राजु उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर व त्याचा भागीदार दिनू शेठ उर्फ भुषण पाटील रा. धुळे – (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या संगनमताने चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच वाहन क्र. MH-40 CD- (चालक व मालक नाव माहित नाही) यांचाही सहभाग आहे.
या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गु.र.नं. 35/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 123, 318(2), 318(4), 336(3), 3(5), महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(सी), 65(डी), 65(ई), 65(फ) तसेच मोटार वाहन कायदा कलम 52 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविराज कांबळे, सपोफौ निंबाळे, पोह अमोल यादव, पोह जाधवर, पोह रामदास मालचे, चापोह विजय गायकवाड, पोकाँ प्रसाद मांढरे, पोकाँ शंकर पाटील यांनी केली.























