फूलवळ – शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यास रस्त्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून मोहीम राबवून पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले, असे असले तरी काही शेतकऱ्यांनी पाणंद रस्ते बंद केल्याने इतर शेतकऱ्यांना शेतात ट्रॅक्टर व इतर साधने नेताना अडचणीचा सामना करावा लागतो. यात अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्यामुळे शासनाने पाणंद रस्ते मोकळे करून द्यावे, अशी मागणी फूलवळ येथील शेतकरी होनाजी गोविंद शेळगावे आणि तेथे सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वांनी दिलेल्या निवेदनानुसार फूलवळ येथे गट नंबर 491/492/493/494/495/496 मधील अंदाजे 20 हेक्टर 34 आर शेतजमीन असून, काही शेतकऱ्यांनी पारंपरिक रस्ता बंद केला आहे. त्यामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्याकरिता ट्रॅक्टर नेण्यास अडचणी निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर पांदण रस्ता मोकळा करुन द्यावा , अशी मागणी केली आहे. मागणीची दखल घेऊन फुलवळ मंडळाचे मंडळ अधिकारी एस आर शेख आणि तलाठी बालाजी केंद्रे यांनी जाय मोक्यावर येऊन या पांदण रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर हा रस्ता शेतकऱ्यांना मोकळा करून देऊ असे आश्वासन दिले आहे.


















