पंढरपूर – येथील गोपाळपूर रस्त्यावरील वैकुंठ स्मशान भूमी पाशी दर्शन मंडप न करता, तो पर्यायी जागेवर करावा अशी मागणी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, हिंदू महासभा व अन्य भाविक संघटना यांच्या वतीने शासनाला करण्यात आल्याची माहिती पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना अभयसिंह कुलकर्णी इचगावकर यांनी सांगितले की,श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनासाठी जाताना, स्मशाना जवळून जावे लागणे अत्यंत अशुभ आहे. या महिन्याचे अखेरीस सरकार स्मशानभूमी शेजारी दर्शनमंडपाचे भूमीपूजन करणार अशा वार्ता येत आहेत.
स्मशानभूमी ही अपवित्र, अशुभ मानली गेली आहे. तेथे जावून आल्यावर स्नान करुन शुचिर्भूत व्हावे लागते, असे असताना श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी तेथून प्रारंभ करावा लागणे दुर्दैवी आहे. तसेच हा परिसर नदीकाठाला लागून व पूररेषेच्या आत आहे. सरकार पूररेषेच्या आत लोकांना बांधकामांना बंदी घालते. तशा निषेधक रेषा ओढते व स्वतः मात्र त्यात बांधकाम करु पाहते. हे फार वाईट व धोकादायक असून, पुढे मागे वारकरी, भाविक, दर्शनार्थींवर वाईट वेळ आणू शकणारे आहे.
यापेक्षा वारकरी संघटनांनी व अन्य भाविकहितैषी संस्थांनी सुचविलेल्या पर्यायी जागांवर असे प्रकल्प राबवावेत की ते प्रत्यक्ष भाविकांना योग्य प्रकारे उपयोगी पडतील. गेली अनेक वर्षे, मध्यवर्ती भाविक सुविधा केंद्राचा पर्याय सुचविला जात आहे. परंतु शासनाला वारकरी भाविकांना जास्तीत जास्त त्रास देण्याची इच्छा आहे. त्यामुळे चांगले पर्याय मुद्दामहून नाकारले जातात. खरे तर सध्या आहे तो दर्शन मंडप योग्य सुधारणा करून टोकन दर्शनासाठी वापरायला पुरेसा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांनी नुकतेच वढू तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी इतर जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव दिला आहे तसेच ग्रामस्थांच्या सूचना प्रशासनाने ऐकून घ्याव्या असेही निर्देश दिलेले आहेत. येथे पंढरपुरात मात्र प्रशासन अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाने अनेक शासकीय जागा व अब्जो, खर्वो रुपये खर्च होऊन वाया गेले आहेत, जात आहेत हा दर्शन मंडप व प्रस्तावित कॉरिडॉर हे याचे उत्तम उदाहरण आहे.
तरी स्मशान भूमी पाशी दर्शन मंडप न करता, तो पर्यायी जागेवर करावा अशी मागणी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, हिंदू महासभा व अन्य भावीक संघटना याच्यावतीने करीत आहोत. या मागणीस वारकरी पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प.राणामहाराज वासकर, मंदिर हितरक्षण समितीचे गणेश लंके यांनीही पाठिंबा दर्शविला आहे असेही अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर यांनी सांगितले.
























