माहूर – माहूर लगतच्या महागाव तालुक्यातील हिवरा संगमजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आज शनिवारी (दि. ३१) दुपारी १ वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अंबोडा (ता. महागाव) येथील देवानंद दिलीप दोडके या युवकाचा टिप्परच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर शुभम उकंडा पाटे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे याआधीही गुरुवारी याच ठिकाणी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
एकविरा देवी मंदिर परिसराजवळ झालेल्या या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, दुचाकीस्वार देवानंद दोडके याचा टिप्परच्या चाकाखाली अक्षरशः चेंदामेंदा झाला. रेतीने भरलेला टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलच्या तणाव्याला अडकला असून त्याचे समोरचे चाक निखळून पडले आहे.
अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या शुभम पाटे यास माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. देवानंद दोडके याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सवणा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच हिवरा येथील सर्पमित्र आशिष हातमोडे, विवेक कदम यांनी प्रसंगावधान राखत जखमीला खासगी वाहनातून तातडीने रुग्णालयात हलविले. ग्रामपंचायत सदस्य राजू धोतरकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. ठाणेदार धनराज निळे, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक किशोर गवई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुरुवारनंतर याच ठिकाणी झालेला हा दुसरा अपघात असून, दोन्ही अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या टिप्परचा पाठलाग यवतमाळ आरटीओकडून सुरू होता. आरटीओ ला चकमा देऊन पळ काढण्याच्या इराद्याने चालक प्राणघातक वेगाने टिप्पर पळवत होता. पाठलागादरम्यानच हा अपघात घडल्याचा कयास व्यक्त केला जात असून, अपघातानंतर आरटीओ पथक घटनास्थळी न थांबता महागावच्या दिशेने निघून गेल्याचे हजारो नागरिकांनी पाहिल्याचा दावा केला जात आहे. अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, महामार्गावर सुरू असलेली बेशिस्त रेती वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

























