सोलापूर – साधारणपणे सर्वच सापांच्या शरीरावर संरक्षणासाठी खवले असतात. मात्र नागपूरमध्ये आढळलेल्या एका पाणदिवड सापामध्ये ही नैसर्गिक रचना पूर्णपणे अनुपस्थित असल्याचे आढळून आले असून, या अत्यंत दुर्मिळ अवस्थेची जागतिक स्तरावर शास्त्रीय नोंद झाली आहे. सोलापूर येथील सर्प अभ्यासक व संशोधक राहुल शिंदे यांचे यावरील संशोधन अमेरिकेतील कंसास आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या अग्रगण्य आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २६ जानेवारी रोजी प्रकाशित झाले आहे.
सापांच्या त्वचेवरील खवले बीटा-केराटिन या प्रथिनांपासून बनलेले असतात. हे खवले त्वचेला मजबुती देणे, पाणी टिकवणे तसेच भक्षकांपासून संरक्षण करतात. काही दुर्मिळ परिस्थितींमध्ये जनुकीय किंवा पर्यावरणीय कारणांमुळे या प्रथिनांची निर्मिती बाधित होते आणि साप खवलेविरहित जन्माला येतो. या अवस्थेला शास्त्रीय भाषेत मेरोलेपिडोसिस असे म्हणतात.
ही दुर्मिळ अवस्था ११ जुलै २०२४ रोजी नागपूरच्या निरंजन नगर परिसरातील एका घरात आढळलेल्या सुमारे ६० सेंटीमीटर लांबीच्या पाणदिवड सापामध्ये दिसून आली. सर्पमित्र संतोष सोनी व गजू पटले यांनी सापाचे निरीक्षण करून त्याची छायाचित्रे राहुल शिंदे यांना पाठवली. छायाचित्रांमधून पाठीवरील खवले पूर्णपणे अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. सखोल अभ्यासानंतर ही पाणदिवड सापामधील मेरोलेपिडोसिसची जगातील पहिलीच नोंद ठरली.
यापूर्वी २०२१ मध्ये सोलापूर येथे दोन नागांमध्ये आणि २०२३ मध्ये गुजरातमधील पोरबंदर येथे एका तस्कर सापामध्ये अशी अवस्था नोंदवली गेली होती. विशेष म्हणजे भारतातील सर्वच नोंदी औद्योगिक किंवा प्रदूषित भागांमधून झाल्या असून, पर्यावरणातील विषारी घटकांचा वन्यजीवांच्या जनुकांवर परिणाम होत असल्याची शक्यता या संशोधनातून अधोरेखित करण्यात आली आहे.
या संशोधनासाठी देवेंद्र भोसले, ओंकार यादव, युनूस मणेर, अनिल अलदार यांच्यासह अनेक सर्पमित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, ही नोंद भारतीय सर्प-अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
























