महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपटावर राजकीय तथा सामाजिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व तथा दबदबा असणाऱ्या परळी वैजनाथ तालुक्याला पुनश्च एकदा मंत्रीपदाचा बहुमान मिळाला असून यावेळी तालुक्यातील सखाराम सटवाजी कराड यांना महाराष्ट्र राज्याच्या शाडो कॅबिनेटमध्ये माहिती व तंत्रज्ञान तसेच जनसंपर्क मंत्रि म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्यच नव्हे तर सबंध देशामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तथा धार्मिक बाबीमुळे परळी तालुक्याचा नावलौकिक आहे. येथील महाऔष्णिक विद्युत केंद्र, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, दळणवळणासाठी देशाची जीवन वाहिनी समजली जाणारी रेल्वे यामुळे देखील तालुक्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. परंतु राज्यामध्ये परळी वैजनाथ तालुका नेहमी चर्चेत असतो तो येथे चालणाऱ्या राजकीय सारीपाटामुळे. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, माजी आमदार रघुनाथराव मुंडे तसेच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे, जिल्ह्याच्या विद्यमान खासदार प्रीतम ताई मुंडे, राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यासह अनेक रत्ने परळीच्या या मातीने दिले आहेत.
आता पुन्हा एकदा परळी तालुक्याला महाराष्ट्राच्या शाडो कॅबिनेट मध्ये मंत्रीपदाचा बहुमान मिळणार असून सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या “Young Inspirater Network” (यीन) या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निवडणुकीत परळी तालुक्यातील सिरसाळा येथील पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले तथा वाका या गावचे रहिवाशी सखाराम सटवाजी कराड यांनी बाजी मारली असून ते विधिमंडळामध्ये माहिती व तंत्रज्ञान तसेच जनसंपर्क मंत्री म्हणून एकदिवसीय काम पाहणार आहेत. विधिमंडळात तशी प्रतीकात्मक शपथ देखील विधानसभेचे सभापती ना.राहुल नार्वेकर यांनी सखाराम कराड यांना बुधवारी दिली आहे. तालुक्यातील सखाराम कराड यांना महाराष्ट्र राज्याच्या शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये एक दिवस काम करण्याची संधी लाभत असून सखाराम कराड यांच्या रूपाने परळी तालुक्याला पुनश्च एकदा मंत्री पद मिळाले असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करून अभिमान व्यक्त केला जात आहे.