सांगोला – दि.१७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत स्पर्धेमधील अनेक गावांमध्ये युद्ध पातळीवर विकास कामे सुरू होती. मात्र मध्यंतरीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्याने अभियानाची गती मंद झाली होती.
या अभियानाला गती मिळावी व जी गावे स्पर्धेत आहेत त्यांच्याकडून कामाची योग्य पद्धतीने पूर्तता व्हावी याकरिता सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगोला तालुक्यातील वाढेगांव, कमलापूर, चिणके, पारे, अकोला या गावाना भेटी देऊन अभियानातील कामाचा आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामाची माहिती घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
वाढेगाव येथे केलेली वृक्ष लागवड, त्यासाठी केलेली सिंचन व्यवस्था, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, महिला बचत गट, दिव्यांगाच्या सवलती, घरकुल योजना, ग्रामपंचायत वसुली तसेच नाविन्यपूर्ण राबवलेले उपक्रम याविषयी सविस्तर माहिती विविध खात्याच्या अधिकाऱ्याकडून जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.
यावेळी कुलदीप जंगम यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सेवा कर्मी म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने वैजिनाथकाका घोंगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर वाढेगांव येथील त्रिवेणी संगमावरील तीर्थक्षेत्राच्या व पर्यटन स्थळाच्या विकास कामाला भेट दिली व त्या परिसराची सविस्तर माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी सहा.गटविकास अधिकारी वसंत फुले, पं.स.चे विकास अधिकारी अमोल तोडकरी, ग्रा.रु.चे डॉ.संदीप देवकते, प.वै.अधिकारी डॉ. नितीन गायकवाड, सरपंच कोमल डोईफोडे, ग्रा.वि.अधिकारी, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्य, प्रा.वि.चे शिक्षक, महिला बचत गटाच्या प्रमुख, आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडीसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















