जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणी सह अनेक वर्षापासूनच्या मागण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होत नसल्याचे निषेधार्थ दिनांक 14 मार्चपासून विविध संघटनेच्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. त्या अनुषंगाने सोनपेठ येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारुन आंदोलन सुरू केले आहे.
1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्याच्या संदर्भात हा संप सुरू आहे. या संपास सोनपेठ तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपा मध्ये सहभागी होऊन आंदोलन स्थळी आपली हजेरी लावली होती.
यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारचे विरोधात घोषणाबाजी केली.हा संप सरकारी, निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सुरू आहे. संपामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील व शासकीय निमशासकीय नोकरीतील विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सामील झाले आहेत. शासनाने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन जुनी पेन्शन योजना तात्काळ सुरू करण्याची मागणी अधिकारी व कर्मचारी वर्गातून केली जात आहे.