राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात आरोग्य विभागात बोगस अधिकारी असल्याची माहिती समोर येताच ,सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन हादरले होते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत असलेल्या जिल्हा लेखा अधिकारी ( डॅम) वैशाली थोरात यांची चौकशी सुरू झाली आहे.याबाबत अधिकृत माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली आहे.वैशाली थोरात यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील डॅम(डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर )या पदावर रुजू होताना, टॅलीचे प्रमाणपत्र बोगस दिले असल्याचा आरोप एका सामाजिक संघटनेने केला होता.
अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस ऍक्शन कमिटीच्या पदाधिकाऱ्यानी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बागडे यांना लेखी निवेदन देऊन वैशाली थोरात यांच्या कागदोपत्रांची चौकशीची मागणी केली होती.याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित होताच मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील लेखा अधिकारी ( डॅम )वैशाली थोरात यांची चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये डॅम (डिस्ट्रिक्ट अकाउंट मॅनेजर) वैशाली थोरात यांनी 2008 साली नोकरीवर रुजू होताना टॅलीचे प्रमाणपत्र बोगस दिले असल्याचा आरोप करण्यात आला होता.याबाबत महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ या संस्थेने 11 जानेवारी 2019 रोजी अहवाल दिला होता.
याअहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, टॅलीचे प्रमाणपत्र हे बोगस आहे. त्याबाबतचे पत्र सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाला यापूर्वीच पाठविण्यात आले आहे.हे बोगस प्रमाणपत्र सोशल मीडियावरवर देखील वायरल झाले आहे.याची गंभीर दखल सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांवर विशेष लक्ष देत असतात.या जिल्ह्यातील नागरीकांना आरोग्य सुविधा मध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये याची काळजी घेतात.पण आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या जिल्ह्यात बोगस अधिकारी वावरत असल्याने आरोग्य खात्याचे लक्तरे वेशीवर टांगण्यात आली आहे.