पंढरपूर विकास आराखडयाबद्दल असलेल्या शंका आणि प्रश्न यांचे निराकरण करूनच पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत योग्य तो मार्ग काढण्यात यावा. याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करणारे सल्लागार आणि प्रशासन यांचा समन्वय झाला पाहिजे. वारकऱ्यांनी तयार केलेल्या प्रारूपाचा आराखड्यातील चांगल्या गोष्टीचा समावेश करता येऊ शकेल. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. मात्र सदर बैठकीत होणाऱ्या चर्चेअंती मिळणाऱ्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ना. डॉ. गोऱ्हे यांना बैठकीपूर्वीच सांगितले होते.
वाराणसीमध्ये काय प्रकारचे पुनर्वसनाचे पॅकेज काय दिले, याची माहिती प्रशासनाने द्यावे असेही निर्देश मी देत आहे. या बैठकीतून चांगल्या प्रकारचा तोडगा यात निघू शकेल. स्थानिकांच्या सूचनांचे एकत्रीकरण करून जिल्हा प्रशासनाला द्याव्यात. त्यावरील संभाव्य उपाय योजना काय असतील, याची माहिती वारकऱ्यांना द्या. पंढरपूर आगामी काळात अतिशय सुविधाजनक असेल यावर लक्ष द्यावे. कोणत्याही पुरातन वास्तूंना धक्का लागणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल, असे आग्रही मत आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या विषयावर विधान भवनात बैठक बोलावली होती.
आ. मनीषा कायंदे यांच्या विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आराखड्याबाबत नागरिकांच्या असलेल्या हरकती आणि त्यावरील संभाव्य उपाय योजनाबाबत माहिती दिली. मंदिर विकास, पंढरपूर विकास, वाळवंट विकास अशा विषयावर केलेली कामे, रस्ते, शौचालये यांची माहिती दिली. विधान भवनात आयोजित या बैठकीला मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, ना. उदय सामंत, ना. तानाजी सावंत, आ. सचिन अहिर, आ.मनीषा कायंदे, आ. अमोल मिटकरी, आ. महादेव जानकर, आ. रणजीत सिंह मोहिते पाटील, आ. महादेव जानकर, आ. समाधान आवताडे, मंदिर समितीच्या माधवी निगडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील गावडे, पुरातत्व खात्याचे उपसंचालक वाहने, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद माळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहसचिव नगरविकास प्रतिभा भदाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंदिर सल्लागार तेजस्विनी आफळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, पत्रकार सुनील उंबरे, सुनील दिवाण, आदित्य दादा फत्तेपूरकर, वीरेंद्र उत्पात, बाबा बडवे, रामकृष्ण महाराज वीर आदी उपस्थित होते.