अहमदाबाद: पावसामुळे रविवारी आयपीएल २०२३ची फायनल मॅच होऊ शकली नाही. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील ही लढत आता आज सोमवारी होणार आहे. फायनल मॅचसाठी काल चाहत्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती. मात्र टॉसच्या काही मिनिटे आधी पावसाला सुरुवात झाली. अशात सर्वजण कधी एकदा पाऊस थांबतोय याची वाट पाहत असताना मैदानात एक राडा झाला, ज्याची चर्चा सोशल मीडियापासून सर्व ठिकाणी होत आहे.
पावसाने हजेरी लावल्याने सर्व चाहत्यांनी स्टेडियमच्या वरच्या भागात आसरा घेतला. अशात एक महिला आणि पोलिस कर्मचारी यांच्यात मोठा वाद झाला. या वादात महिलेने संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण देखील केली. या घटनेचा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला स्टॅड्समध्ये बसलेली दिसते. अचानक दोघांत काही तरी झाले आणि महिलेने पोलिस कर्मचाऱ्याला मारण्यास सुरुवात केली. ही महिला कोण आहे आणि ऑन ड्यूटी पोलिस कर्मचाऱ्यावर कसा काय हात उचलला याबाबत काही माहिती मिळाली नाही. संबंधित महिलेवर कारवाई झाली की नाही हे देखील कळू शकले नाही. या व्हिडिओची सत्यता तपासलेली नाही. मात्र ट्विटमध्ये रिप्लायमध्ये अनेकांनी असे म्हटले आहे की, संबंधित पोलिस कर्मचारी नशेत होता आणि महिलेसोबत उद्धटपणे वागत होता. काही ट्विटर युझर्सनी महिलेवर टीका केली आहे.