शिर्डी : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी केल्यानंतर या महामार्गावरून नागपूर-शिर्डी ही बस धावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवून नागपूरहून रवाना केली होती. नागपूरहून शिर्डीसाठी दुपारी ३.३० वाजता निघालेली ही बस रात्री १०.१५ पर्यंत शिर्डीत पोहचली. अवजड वाहन असल्याने ताशी ८० ची वेगमर्यादा असल्यामुळे ही बस सहा तासात शिर्डीत दाखल झाली.
समृद्धी महामार्गावर तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमच्या वाहनाची नोंद केली जाते. त्यानंतर ज्याठिकाणी तुम्ही बाहेर पडणार आहे तिथे एक्झिटला टोलनाक्यावर टोल भरला जातो. साधारण ३ हजार रुपयांचा आम्ही टोल भरला असे या बसच्या वाहन चालकाने सांगितले.
दरम्यान, पहिल्यांदाच आम्ही समृद्धी महामार्गावर आम्ही प्रवास केला. या रोडवरून प्रवास करताना आम्ही आनंद घेतला. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी इतक्या कमी वेळात पोहचलो, असे बसमधील महिला प्रवाशाने सांगितले.
या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता ६ तासांत हा प्रवास होत आहे.
समृद्धी महामार्गामुळे देशात महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. सर्वाधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग असलेल्या राज्यांच्या पंक्तीत महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर असेल. याआधी महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे.