लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक अक्कलकोटला येथ असतात. केवळ सोलापूरच नाही तर मुंबई, पुण्यासह परराज्यातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात अक्कलकोटला येत असतात. मागील काही महिन्यांपासून तर स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतलाय. मागील काही दिवसात या सायबर गुन्हेगारांनी अनेक स्वामी भक्तांना फसवल्याची माहिती आहे.
अक्कलकोटला आल्यानंतर राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अनेक जण मंदिर आणि अन्नछत्र मंडळाच्या भक्त निवासाचा पर्य़ाय निवडतात. दुसऱ्या जिल्ह्यातून येणारे भाविक इंटरनेटचा वापर करुन भक्त निवास बद्दल माहिती सर्च करीत असतात. नेमका याचाच गैरफायदा या सायबर गुन्हेगारांनी उचलाला आणि भक्त निवासाच्या नावाने खोटी माहिती आणि फोन नंबर ऑनलाईन संकेतस्थळावर दिली.
या खोट्या संकेतस्थळावर वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवासाचे फोटो आणि इतर कुठल्या तरी हॉटेल्सचे फोटो लावून लोकांना आकर्षित केले. या सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर भाविक ज्यावेळी बुकिंगसाठी संपर्क करायचे त्यावेळी त्यांना आधार कार्ड मागितले जायचे. सोबतच अँडव्हान्स म्हणून पैसे देखील पाठवयाला सांगितले जायचे. अचानक गैरसोय होऊ नये म्हणून अनेक भाविकांनी देखील 700 ते 1200 रुपये या नंबरवर पाठवले.
या ऑनलाईन माहितीद्वारे भक्त निवास बुकिंग झाल्याचे समजून ज्यावेळी भाविक अक्कलकोटला पोहोचायचे त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे. साधारण 15 ते 20 भाविकांनी अशा पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाला कळवली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने देखील यासंदर्भात लोकांकडून माहिती घेऊन अक्कलकोट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अक्कलकोट पोलिसांनी ही तक्रार सायबर पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती आहे. मात्र फसवणूक झालेल्या भाविकांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा मनस्ताप आणि भूर्दंड सहन करावा लागला.
अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीतर्फे भक्त निवास सुरु करण्यात आले. कोणीही गैरफायदा घेऊ नये आणि सर्वसामान्य भाविकांना सोय व्हावी यासाठी प्रशासनाने फोनद्वारे किंवा ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरु केलेली नाही. जे भाविक आधी येतील त्यांना आधी रुम मिळेल हेच तत्व अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे भाविकांना सायबर गुन्हेगारांच्या भूलथापास बळी पडू नये असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.