“द एलिफंट व्हिस्परर्स” या ऑस्कर विजेत्या माहितीपटाद्वारे तामिळनाडू वन विभागाच्या उपक्रमांना हत्तींची निगा राखण्याच्या व्यवस्थापनासाठी जागतिक मान्यता मिळाली ही खूप अभिमानाची बाब आहे. आपला राष्ट्रीय वारसा जपण्याचा एक भाग म्हणून हत्तींचे संरक्षण करणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपती मुर्मू यांनी शनिवारी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील आशियातील सर्वात जुन्या हत्ती शिबिरांपैकी एक असलेल्या थेप्पाकडू हत्ती शिबिराला भेट दिली आणि तेथील माहूत आणि कावडी म्हणजेच हत्तीची सवारी करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. आशियामध्ये हत्ती संवर्धनात अग्रगण्य बनण्यासाठी सरकार थेप्पाकडू हत्ती कॅम्प येथे “अत्याधुनिक हत्ती संवर्धन केंद्र आणि पर्यावरण भवन” स्थापन केले. यावर राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.
भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यात आदिवासी समुदाय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे घटनात्मक अधिकार सुनिश्चित करणे आणि त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. थेप्पाकडू हत्ती शिबिराचे व्यवस्थापन करण्यासाठी बेट्टाकुरुंबर, कट्टुनायकर आणि मलासर आदिवासी समुदायातील लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि अनुभव वापरला जात आहे, यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.