नक्षल प्रभावित भागात रस्ते, दळणवळणाचे जाळे मजबूत करण्यासाठी विशेषत: सर्व गावांना इंटरनेटने जोडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह दिले. भुवनेश्वरमध्ये ओडिशातील आपत्ती व्यवस्थापन आणि नक्षलवादाच्या समस्येसंदर्भात शनिवारी आढावा घेतला. या बैठकीला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय गृह सचिव, गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याने सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी दुकानांची स्थापना करावी, रस्ते बांधणी तसेच नक्षल प्रभावित भागात विजेची तरतूद करण्यासाठी निधी राखून ठेवण्याचा विचार करावा असा सल्लाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिला. यावेळी गृहमंत्र्यांनी आपत्ती निवारणात, आपत्ती प्रतिसादासारख्या उचलेल्या उपाययोजनाबद्दल ओडिशा सरकारचे स्वागत केले, ओडिशा राज्याला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी केंद्र सरकार राज्याच्या प्रयत्नांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी राज्य सरकारला दिले.
नक्षलवादाच्या प्रश्नावरही केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांना पूरक म्हणून नक्षल प्रभावित भागातल्या पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी डाव्या कट्टरपंथी चळवळींचा (नक्षलवादाचा) उपद्रव दूर करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या पूर्ण पाठिंबा देईल, असे आश्वासन दिले. दळणवळण, शिक्षण आणि रोजगाराचा अभाव यासह नक्षल विचारसरणीच्या वाढीस हातभार लावणाऱ्या सर्व समस्यांकडे आपण लक्ष दिले पाहिजे,असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.