१५ लाख रुपयांच्या लाचप्रकरणी ‘एसीबी’च्या कोठडीत असलेले तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बहिरम यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
राजूरबहुला येथील मुरूम उत्खनन प्रकरणात संबंधित जमीनमालकाला बहिरम याने सव्वा कोटींचा दंड ठोठावला होता. या आदेशाविरुद्ध जमीनमालकाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. त्यांनी हे प्रकरण फेरचौकशीसाठी पुन्हा बहिरम यांच्याकडे पाठविले. उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापरल्याचा जमीनमालकाचा दावा असल्याने स्थळ निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी बहिरम याने संबंधितांकडे तडजोडीअंती १५ लाखांची लाच मागितली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून त्याला लाच ‘घेताना पकडण्यात आले होते. बहिरम हे १० ऑगस्टपर्यंत ‘एसीबी’ कोठडीत असतील. त्यातच आता निलंबित करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.