दौंडवरून उजनी धरणात येणारा विसर्ग पूर्णत: बंद झाला आहे. गतवर्षी १२ ऑगस्ट रोजी उजनी १०१ टक्के भरले होते. १५ ऑगस्टपासून ४० ते ४५ हजार क्युसेकचा विसर्ग खाली सोडावा लागला होता. पण, यंदा पावसाळा सुरु होऊन दोन महिने संपले, तरीदेखील धरण १३ टक्क्यांवरच आहे. यंदा १५ जून ते ८ जुलै या काळात सरासरीच्या तुलनेत २० टक्के सुद्धा जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली, पण अद्याप उजनीला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. आता पुन्हा पावसाचा खंड पडीला असून उजनी धरण १३ टक्क्यावर स्थिरावले आहे.
खडकवासला, कळमोडी, वडीवळे ही धरणे हाऊसफुल्ल भरल्यावर दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग मोठा असतो. पण, ही धरणे पूर्ण क्षमतेने भरत असतानाच पाऊस कमी झाला आणि उजनीतील विसर्ग देखील कमी झाला.आता दिलासादायक बाब म्हणजे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात चार मीटर पाणी आहे. तरीदेखील आणखी १५ ते २० दिवस पाऊस न झाल्यास सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे शेतीसाठी तुर्तास पाणी सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.