येथील नीलिमा चव्हाण हिच्या व्हिसेरा अहवालानुसार तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दापोतील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी गेल्या २९ जुलै रोजी निघाली. मात्र तिचा मृतदेह १ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीत आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले होते. तपासात १०४ साक्षीदारही तपासले. व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पोलिसांनी केली होती.
हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, तिच्या शरीरात कोठेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर कोठेही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.दरम्यान नीलिमा चव्हाणच्या नातेवाईकांनी ती काम करीत असलेल्या बँकेच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध माहिती पोलिसांना दिली आहे.