देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यावेळी त्यांनी विश्वकर्मा जयंतीचे औचित्यसाधून विश्वकर्मा योजनेची घोषणा केली.
याप्रसंगी विश्वकर्मा योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करेल, असंही यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी आणि चर्मकार या पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून त्यांना त्यांचा व्यावसाय वाढवण्यासाठी मदत केली जाईल. तसेच मुद्रा योजनेतून तरुणांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतून आठ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे.
प्रत्येक व्यवसायाने 1-2 लोकांना रोजगार दिला आहे. देशाच्या युवा शक्तीवर माझा विश्वास आहे, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात नमूद केले. युवाशक्तीमध्ये क्षमता आहे आणि त्याच युवाशक्तीला अधिक बळ देण्याचं आमचं धोरण आहे. आपल्या देशातील तरुणांनी भारताला जगातील पहिल्या 3 स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवून दिले आहे. आज जगभरातील तरुण भारताची ही क्षमता पाहून आश्चर्यचकित झाल्याचे मोदी यांनी सांगितले.