महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरुन भाजप नेत्यांविरुद्ध टीकेची झोड उठली असताना अमृता फडणवीस यांच्या नव्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवरुन भाजप नेत्यांविरुद्ध टीकेची झोड उठली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे नवे राष्ट्रपिताआहेत. महात्मा गांधी हे तत्कालीन राष्ट्रपिता होते, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीस यांनी नागपूर येथे अभिरुप कोर्टाच्या एका कार्यक्रमाला नुकतंच संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी भारताचे नवे राष्ट्रपिता असा उल्लेख करता गौरोद्गार काढले. नरेंद्र मोदी भारताचे राष्ट्रपिता आहेत तर महात्मा गांधी कोण आहेत, असा प्रतिसवाल मुलाखतकर्त्याने अमृता फडणवीस यांना केला. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर नरेंद्र मोदी हे देखील भारताचे नवे राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे तत्कालिन राष्ट्रपिता होते, असं देखील अमृता यांनी यावेळी स्पष्ट केलं. आता अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटणाची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले होते. इतकंच नाही तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण ढवळून निघालं होतं. तेव्हा अमृता फडणवीस यांनी राज्यपालांचा बचाव केला होता.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशजांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. साताऱ्याचे खासदार उदयसिंह राजे भोसले यांनी तिव्र संताप व्यक्त केला होता. तर दुसरीकडे विरोधीपक्षाने म्हणजे महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.