स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांना देण्यात आलेली मुदत संपली असली तरीही त्यांनी जे आक्षेप घेतले आहे. त्यावर आता संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडेच खुलासा मागण्यात आला असून तो खुलासा 19 तारखेपर्यंत देण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमच्या घरातील वाद हा घरातच मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रविकांत तुपकर यांनी काही आक्षेप प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून घेतले होते. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना 15 ऑगस्ट रोजी ग्यानेद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. त्या समितीसमोर हजर होऊन म्हणणे मांडण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. त्यानंतर त्यांची पंधरा तारखेला वाट बघण्यात आली. परंतु ते समिती समोर हजर झाले नाही, तर त्यांनी सर्व साधारण समितीला एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये प्रसिद्धी माध्यमांसमोर जे आक्षेप घेतले आहेत, तेच आक्षेप त्यांनी घेतले असून त्यामध्ये नव्याने दोन-तीन मुद्दे हे राजू शेट्टी यांच्या संदर्भातले आहेत. त्यामुळे समितीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना यावर म्हणणे मांडण्यासाठी 19 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष जगताप यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महत्त्वाची शेतकरी संघटना आहे आणि संघटनेसाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. त्यामुळे आमच्या घरातील जो काही वाद आहे तो आम्ही घरातच मिटवू आणि येणाऱ्या काळामध्ये संघटना अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.