देवळे (ता. संगमेश्वर) येथील जंगलवाडी परिसरात गवारेड्यांचा वावर सुरू झाला असून त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील जंगलवाडी परिसरात गवारेड्यांचा वावर वाढला आहे. देवळे, जंगलवाडी, चाफवली, परिसरात आंबा हंगामापासूनच गवारेड्यांचा त्रास शेतकरीवर्गाला होत आहे.
गवा रेडे बागांमधील आंबा, काजूची झाडे मोडून टाकत असल्याच्या तक्रारी या भागातील शेतकरी करत आहेत. आंबा कलमांना घासून आंब्यांची मोठी नासधूस केल्याचे शेतकरी सांगत आहेत. आठ ते दहा गव्यांचा कळप सध्या जंगलवाडी, देवळे फाट्यावर दिसत असल्याने लोकांमधे घबराट पसरली आहे. या फाट्यावरूनच देवळे, चाफवली, मेघी या भागातील महिला, विद्यार्थी, प्रवाशांना उतरून पुढे प्रवास करावा लागतो. याच भागात गवारेड्यांचा वावर असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.