कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर आदीनसिंह भर्फ कल्ला बावरिया अखेर मध्य प्रदेशच्या स्टेट टायगर स्ट्राइक फोर्सच्या जाळ्यात अडकला. अनेक दिवसांपासून तो गुंगारा देत होता. दहा वर्षांपूर्वी मेळघाटातील शिकार प्रकरणात त्याचा सहभाग राहिला. तेव्हापासून तो फरार होता. गडचिरोली व ताडोबा प्रकरणातसुद्धा त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर आदीनसिंह उर्फ कल्ला बावरिया हा १८ ऑगस्ट रोजी विदिशा-सागर या राज्य मार्गाने जात असल्याची गोपनीय माहिती मध्य प्रदेश स्टेट टायगर स्ट्राइक फोर्सला केंद्राच्या अखत्यारितील वन्यजीव गुन्हे अपराध नियंत्रण ब्युरोकडून देण्यात आली होती. त्यावर ग्यारस पूर्णनजीक त्याला घेराबंदी करून पकडण्यात आले. त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून त्यात तो देशातील अनेक राज्यात केलेल्या वाघांच्या शिकारीचा खुलासा करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संपूर्ण घटनेचा खुलासा प्रधान मुख्य वनसंरक्षक (भोपाळ) यांच्या कार्यालयाने केला आहे.
देशातील विविध भागांत शिकारी
आदीनसिंह उर्फ कल्ला बावरिया याचा तामिळनाडू, महाराष्ट्र, आसाम, मेघालय येथील वाघांची शिकार व तस्करी प्रकरणात सहभाग आहे. त्याच्याकडून कातडे, हाडे व इतर अवयव जप्त करण्यात आले आहेत. बावरिया टोळीतील अनेक सदस्यांना यापूर्वीसुद्धा अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला कल्ला बावरिया अटकेच्या भीतीने मध्य प्रदेशच्या विदिशा व सागर जिल्ह्यांमध्ये डेरा टाकून लपून होता. भारताला लागून असलेल्या नेपाळ देशातसुद्धा वाघाची शिकार व अवयवांची तस्करी केल्याचा त्याच्यावर गुन्हा नोंदविला गेला आहे. अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर विविध राज्यांचे पोलिस, वन आणि व्याघ्र प्रकल्पचे पथक तसेच नेपाळचे सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो होते, हे विशेष.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २०१३ मध्ये झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणात त्याचा सहभाग आहे. तेव्हापासून तो फरार होता. गडचिरोली व ताडोबा येथील वाघांच्या शिकार प्रकरणात त्याच्या सहकाऱ्यांचा सहभाग आहे. देशातील अजून किती ठिकाणी वन्यप्राण्यांची शिकार व तस्करीत त्याचा सहभाग आहे, याची तपासणी केली जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.