बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत कुठल्याही सक्तीच्या नियमांची घोषणा करण्यात आली नाही. पण जिनोम सिक्वेंसिग आणि कोरोना टेस्ट वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सर्व राज्यांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेचे ऑडिट करत रुग्णालयं सज्ज ठेवावीत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधींच्या लसीकरणावर भर द्या असंही ते म्हणाले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणीही मास्कचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं.
आजच्या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ कमी असली तरीही जगभरात मात्र ही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
आज नागपुरात राज्य सरकारने या संबंधित महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना संदर्भातील टास्क फोर्स पुनर्गठीत करण्याचा निर्णय झाला. राज्यातील तज्ञ डॉक्टर आणि अधिकारी या टास्क फोर्समध्ये असतील. त्यामुळे कोरोना परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकार बारीक लक्ष ठेवून आहे.