वैराग – बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातील राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली असून, एक महत्त्वाची राजकीय घडामोडी समोर येत आहे. युवा नेतृत्व मकरंद निंबाळकर यांनी आज बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे निंबाळकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे वैरागच्या राजकारणाची गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बऱ्याच दिवसांपासून सुरू होती चाचपणी
मकरंद निंबाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून वैराग आणि परिसरातील गावांमध्ये जनसंपर्क वाढवला होता. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि स्थानिक प्रश्नांवर दिलेला लढा, यामुळे ते चर्चेत होते. आपल्या पुढील राजकीय प्रवासाबाबत त्यांनी समर्थकांशी वारंवार चर्चा केली होती. अखेर आज बारामतीत अजितदादांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांच्या राजकीय प्रवासाची दिशा निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
वैरागमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार
अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. मकरंद निंबाळकर यांच्यासारखा तरुण चेहरा पक्षात सामील झाल्यास वैराग गटात राष्ट्रवादीची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. विशेषतः तरुणांचे संघटन आणि निंबाळकर मानणारा मोठा वर्ग राष्ट्रवादीशी जोडला गेल्याने प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
लवकरच होणार अधिकृत सोहळा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून आगामी राजकीय वाटचालीचा ‘रोडमॅप’ ठरवण्यासाठी होती. मकरंद निंबाळकर यांच्या प्रवेशाचा औपचारिक कार्यक्रम मुंबई किंवा वैरागमध्ये भव्य मेळाव्याद्वारे आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेवर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
निंबाळकरांच्या या हालचालीमुळे वैरागच्या राजकारणातील इतर गटांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. “विकासकामांची गती वाढवण्यासाठी आणि अजितदादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ही पावले उचलली जात आहेत,” अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.


























