पंढरपूर – पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीतील नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे उमेदवार निवडण्यासाठी मंगळवारी (ता.२) मतदान घेण्यात आले. यावेळी येथील एका मतदान केंद्रावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांच्यासोबत अनाधिकृतपणे ५ जणांनी प्रवेश केला. त्यामुळे या पाच अनोळखी व्यक्तीविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरू होती. या वेळी तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.प्रणिता भालके व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते तथा विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासोबत इतर पाच जणांनी सारडा भवन जवळी उर्दू शाळा येथील एका मतदान केंद्रामध्ये प्रवेश केला व ईव्हीएम मशीनचे फोटो काढले.
यामुळे गोपनीयतेचा भंग झाला म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मतदान केंद्रप्रमुख दशरथ मोरे यांनी पाच अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादी वरुन पंढरपूर शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे येथील राजकीय वर्तुळात आज खळबळ उडाली असून पोलीस त्या पाच अनोळखी व्यक्तींचा शोध घेत आहेत.


























