सोलापूर : महापालिकेच्या शौचालयाची जागा हडपण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेले १० सीट शौचालय जेसीबीने फोडून ती जागा हडपल्याचा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आला. यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी महापालिका आरोग्य निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी महापालिका घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक विश्वास लमुवेल क्षीरसागर (वय- ४५, रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी नागेश शिवलिंगप्पा कोरे, काशिनाथ कुंभार (दोघे राहणार- अंबिका नगर भाग- ५ सोलापूर) आणि जेसीबी मशीन चालक आणि मालक अशा चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३(५), ३२४(१), ३२४(३), ३२६(सी), ३२९(१), ६२, ३२९(३) आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
शहरातील कुमठा नाका आणि नई जिंदगी परिसरातमधील अंबिका नगर भाग- ५ येथे महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केलेले आहे. या ठिकाणची देखरेख ही फिर्यादी झोन क्रमांक ४ मधील महापालिका आरोग्य निरीक्षक विश्वास क्षीरसागर हे करत असतात. दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेप्रमाणे कर्तव्य बजावल्यानंतर कुमठा नाका परिसरातील अंबिका नगर भाग ५ मधील महापालिकेच्या जागेवरील सार्वजनिक शौचालयातील महिलांसाठी चे ५ सीट आणि पुरुषांसाठीचे ५ सीट असे एकूण दहा सीट सौचालय आरोपींनी दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान जेसीबी लावून पाडून टाकण्यात आले. तसेच जेसीबीच्या माध्यमातून या परिसरातील संपूर्ण महापालिकेची जागा बळकावण्याच्या उद्देशाने आरोपी नागेश शिवलिंगप्पा कोरे आणि काशिनाथ कुंभार आणि त्याच्या साथीदारांनी परवानगीशिवाय सार्वजनिक शौचालय साठी घेतलेले ड्रेनेज लाईन आणि सेफ्टी टॅंक पर्यंत जाणारे संपूर्ण परिसर खोदून काढून उध्वस्त केले. या पद्धतीने त्यांनी शासकीय मालमत्तेचे तसेच महापालिका प्रशासनाचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान केले.
या प्रकारानंतर मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेचे विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता महेंद्र बोटे यांनी आरोग्य निरीक्षक क्षीरसागर यांना कळविले. याची माहिती मिळताच येऊन पाहिले असता आरोपींनी संगणमत करून महापालिकेच्या शौचालयाची जागा हडपण्यासाठी जेसीबीच्या माध्यमातून संपूर्ण सार्वजनिक शौचालय पाडून टाकल्याचे निदर्शनास आले यानंतर त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. मिळालेल्या निर्देशानुसार त्यांनी अखेर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आपली सविस्तर फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र प्रसाद वाघमारे हे करीत आहेत.



























