वाशी / धाराशिव – वाशी तालुक्यात पवनचक्की कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर रिन्यू पवनचक्की कंपनीकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे.
(दि.३०) ऑक्टोबर रोजी पोलिसांनी शेतकरी सुजित मोरे, अशोक शिंदे आणि अरविंद नांगरे (रा. सारोळा) यांना पोलीस स्टेशनला बोलावून घटक केली, तर ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना अटक करून ताब्यात घेतल्याचा फायदा घेत कंपनीने त्यांच्या शेतातच काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाशी तालुक्यातील शेतकरी 220 केव्हीच्या टॉवरसाठी 17 लाख रुपये प्रति टॉवर आणि 22 हजार रुपये प्रति मीटर विद्युत तारेसाठी मोबदला मिळावा, अशी मागणी करत आहेत.
या मागणीसाठी त्यांनी वाशी तहसील कार्यालयासमोर आठ दिवस अमरण उपोषण केले, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथेही आठ दिवस उपोषण केले होते. मात्र कंपनीकडून मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांचा राग वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी सारोळा शिवारात कंपनीचे अधिकारी मोबदला न देता थेट कामासाठी आले असता, शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत “आधी पैसे द्या, मग काम करा” असा ठाम इशारा दिला होता. त्यानंतर कंपनीने उलट शेतकऱ्यांविरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता शेतकऱ्यांच्या अटकेचा फायदा घेत कंपनीकडून शेतांमध्ये जबरदस्तीने काम सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “आमचा मोबदला द्या, मग काम करा! आमचा जीव गेला तरी आम्ही मागे हटणार नाही!” असा आक्रोश संतप्त शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की कंपनीने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून प्रमुख शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन जबरदस्तीने काम सुरू करण्याचा कट रचला आहे. दरम्यान, शेतकरी संघटना या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असून ‘खोटे गुन्हे मागे घ्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या’ अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
 
	    	 
                                




















 
                