सोलापूर : मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून तिचे जतन संवर्धन व प्रसार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या उद्देशाने विजापूर रोड सैफुल जवळील ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व काव्यवाचन आयोजित करण्यात आले होते .
कार्यक्रमाची सुरुवात ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयाच्या प्रास्ताविक भाषणाने करण्यात आली. मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा, संत साहित्य, आधुनिक साहित्य व आजच्या डिजिटल युगातील मराठी भाषेचे ज्ञान यावर प्रकाश टाकण्यात आला. काव्यवाचनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व आपल्या मराठी भाषेवरील प्रभुत्व सादर केले. काही विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिक कवी व संत यांच्यावरील काव्यवाचनाद्वारे माहितीपूर्ण सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थि व विद्यार्थिनीनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. श्री एस. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल सौ. एस. व्ही. कस्तुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी साक्षी उप्पीन व राधिका पुजारी यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचा समारोप प्रा. एल. एस. बिराजदार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.



























