माहूर / नांदेड – माहूर तालुक्यातील टाकळी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून जंगली वानरं धुमाकूळ घालत असून नागरिकांवर हल्ले करणे, मालमत्तेचे नुकसान करणे या सह इतर उपद्रव माजविल्याने ग्रामस्थांसह सरपंच आणि ग्रामसेवक यांनी माहूर वन विभागाला निवेदन देऊन या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
साधारणपणे पंधरा दिवसांआधी मौजे टाकळी गावात अचानकपणे जंगली वानरांच्या झुंडीचा शिरकाव झाला. त्यापैकी एक वानर पिसाळल्यासारखे वागत असून शेतात काम करणारे महिला मजूर वर्ग, शाळेत जाणारी लहान मुले तसेच वृद्ध नागरिकांवर हल्ले करत असून त्याच्या हल्ल्यात आजपर्यंत जवळपास १५ नागरिक जखमी झाले असल्याचे निवेदनात लिहिले आहे. या हल्ल्यात अनुचित घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी हैदोस घालणाऱ्या या वानरासह संपूर्ण टोळीचा तातडीने बंदोबस्त करण्याची गरजेचे झाले आहे.
आधीच बिबटे, रानडुकराचा प्रचंड त्रास असलेले शेतकरी या वानराच्या उपद्रवामुळे वैतागले असून या वानरास पकडण्यास गेलेल्या नागरिकांवरही हा वानर रागात हल्ले करत असल्याने सदरील वानराचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी टाकळी गावच्या ग्रामस्थांसह सरपंच, ग्रामसेवक यांनी निवेदनाद्वारे माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचेकडे केली आहे.























