टेंभुर्णी – विवा हॉस्पिटल, अकलूज आणि जिजाऊ ब्रिगेड (पुणे विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त भव्य महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील शेकडो महिलांनी सहभागी होऊन विविध मोफत आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये महिलांसाठी हिमोग्लोबिन, थायरॉईड, ब्लड शुगर अशा महत्त्वपूर्ण चाचण्यांचे मोफत आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्यासाठी या तपासण्या अत्यंत गरजेच्या असल्यामुळे मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आरोग्यविषयक सुविधा घेतल्या.
कार्यक्रमात विवा हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती गांधी यांनी महिलांच्या दैनंदिन आरोग्य समस्या, गर्भाशय विकार, मासिक पाळीतील तक्रारी तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व महिलांना पटवून दिले.
यानंतर डॉ. जयदीप काळे यांनी IVF व वंध्यत्व उपचार, आधुनिक तंत्रज्ञान, तसेच यामुळे जोडप्यांच्या आयुष्यात होणारे बदल यावर सविस्तर माहिती दिली. महिलांनी वंध्यत्व, हार्मोनल बिघाड व IVF संदर्भातील अनेक प्रश्न विचारत वैद्यकीय सल्ला घेतला.
शिबिरातील विशेष माहितीपर सत्र डॉ. मीनाक्षी जगदाळे यांनी घेतले. “स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असून तिचे आरोग्य मजबूत असेल तर पुढील पिढीही सक्षम राहते,” असे सांगत त्यांनी स्त्रियांच्या आरोग्यजाणीवेत वाढ होण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने महिलांना प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका थोरात यांनी केले.
बालदिनाचे औचित्य साधून लहान मुलांकडून केक कापून बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विवा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, कर्मचारीवर्ग तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी सौ. सुषमा पाटील (उपाध्यक्ष), सौ. सुवर्णा शेंडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या शिबिरात परिसरातील असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला असून अशा उपक्रमांची समाजाच्या सुदृढतेसाठी मोठी गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


















