अनैतिक प्रेमसंबंधातून महिला आणि तिच्या प्रियकराचे डोके कुऱ्हाडीने छाटून त्यांची हत्या करण्यात आली. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाच्या आई वडीलांचा आकांतही महिलेच्या सुडाने पेटलेल्या पतीला परावृत्त करू शकला नाही. अखेर डोळ्यादेखत मुलाचा तडफडून होणारा मृत्यू पाहण्यावाचून त्यांच्या हाती काही राहिले नाही. हा सारा थरार नांदणी बरूर रस्त्यावरील सलगरे वस्तीजवळच्या शेतात भर दुपारी तीन वाजता घडला. म्हणता म्हणता हा प्रकार साऱ्या दक्षिण तालुक्यात वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि एकच खळबळ उडाली. नांदणीतील नरूटे वस्ती येथील श्रीकांत अनिल नरूटे (वय २२) याचे सलगरे वस्तीतील अनिता चेनबसप्पा सलगरे (वय ३८) हिच्याशी जवळपास दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते.
काही महिन्यांपुर्वी या महिलेच्या पतीला त्याची कुणकूण लागली. त्याने त्यांना संबंध तोडण्यासाठी पाच सहा वेळा समजावले होते. मात्र, दोघेही चोरून लपून भेटत राहील्याचे गावातील लोकांनी सांगितले. अनिता घराशेजारील द्राक्षाच्या बागेत कामासाठी गेली. त्यावेळी श्रीकांत तेथे आला. ते दोघे बोलत बसले होते. त्याचवेळी या महिलेचा पती चेनबसप्पा रेवाप्पा सलगरे तेथे आला. त्याने दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांच्यात झटापट सुरू झाली. वस्तीवरील आणखी काही जण आवाज ऐकून तेथे धावत आले. त्यांनी या युवकाला मारहाण करत त्यांच्या वस्तीपर्यंत आणले.
हाणामारीचा आवाज ऐकून या प्रेमसंबंधाची कल्पना असल्याने श्रीकांतचे आई वडील धावत पळत त्याला सोडवण्यासाठी गेले. त्यापुर्वीच महिलेच्या पतीने पळत जाऊन आणलेल्या कुन्हाडीने आधी प्रियकराच्या मानेवर जोरदार वार केला. प्रियकर जमिनीवर कोसळताच त्याने पत्नीकडे मोर्चा वळवला. संतापाच्या भरात तिच्याही गळ्यावर त्याने कुऱ्हाडीने वार केला. तीही जवळच तडफडत पडली होती..तेवढ्यात श्रीकांतचे आई वडील पळतच तेथे पोहोचले होते. त्यांना काय बोलावे ते सुचेना. श्रीकांत समोर तडफडत पडला होता. त्याला पाहून त्याला उचलण्यासाठी ते सरसावले. पुढे होण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या आई वडिलांना जमावाने अडवले. काही झाले तरी तो मेलाच पाहिजे. दवाखान्यात नेऊ देणार नाही, अशी भूमिका वस्तीवरील लोकांनी घेतली. यावेळी तेथे किमान १५ जणांचा जमाव असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात होते.
काही वेळाने श्रीकांतने मान टाकल्यानंतर वस्तीवरील नागरिक परत गेले. त्यानंतर श्रीकांतच्या आई वडिल आपल्या मेलेल्या मुलाच्या मृतदेहाजवळ आकांत करत बसले होते. त्यांच्या आकांताने वातावरण सुन्न झाले. पोलिसांनी एकाच वाहनातून या दोघांना मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे डॉ. मिताली रेड्डी यांनी तपासणी करून मृत असल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदन गुरुवारी करण्यात येणार आसून दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. घटनास्थळावर पोलीस जिल्हा उपअधिक्षक संकेत देवळकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, उपनिरीक्षक अनिल करपे, सहायक फौजदार संदीप काशिद, कैलास राऊत श्रीकांत बुर्जे, दिनेश पवार सागर सुरवसे आणि महिला पोलीस कविता बिराजदार यांनी धाव घेतली. रात्री साडे अकराच्या सुमारास अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर यांनी मंद्रूप पोलिस ठाण्याला भेट देवून तपासाची माहिती घेतली आणि महत्वाच्या सुचना दिल्या.