पंढरपूर – दिवाळीसणा निमित्त फुलांच्या खरेदीसाठी येथील फुलांच्या बाजारात विक्रेते आणि खरेदीदारांची मंगळवारी (ता.२१) मोठी गर्दी झालेली दिसत होती. त्यामुळे येथील फुलबाजार फुलांबरोबर माणसांनी देखील फुलून गेल्याचे दिसत होते. फुलांच्या बाजारात लिलावाच्या वेळी झेंडुची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे झेंडु फुलांना अपेक्षीत दर मिळाला नाही.
सणांचा राजा म्हणून दिवाळी सण ओळखला जातो. गरीब, श्रीमंत आपआपल्या परीने हा सण साजरा करीत असतो. या सणांमधील लक्ष्मी पुजन तसेच बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याचा दिवस हे सर्वात महत्वाचे दिवस असतात. या दिवशी फुलांना सर्वात जास्त मागणी असते. येथील फुलांच्या बाजारात सकाळी दहा ते अकरा वाजल्या पासून फुलांचे लिलाव सुरु झाले.
या वेळी बाजारात पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, झेंड, गुलाब, निशिगंध (गुलछडी), केवढ्याचे कणीस, कण्हेरी फुले, जाई, जुई, आस्टर, वेलवेट, आर्किट (डेरा) फुल, जरर्विरा आदी विविध प्रकारच्या फुलांची आवक झालेली दिसत होती. येथील फुलविक्रेत्यांनी बाजारातून आजच मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी केली.
——————————-
सजावटीच्या साहित्यांला देखील मागणी
येथील फुल बाजारात हार बनविण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्याच्या गुंड्या, हार ओवण्यासाठी लागणाऱ्या विविध आकाराच्या व प्रकारच्या सुया, दोऱ्यांच्या गुंड्या, हारांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी चमकीच्या पट्टया, लहान आकाराचे चमकी लावलेले प्लास्टिकचे चेंडु, हाराला आकर्षकता यावी यासाठी वापरावे लागणारे लहान,मोठे रंगीबेरंगी मणी आदी साहित्यांची विक्री देखील केली जात होती.
———————
उत्पादक मंडळींच झाली विक्रेते
पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर झेंडुची, शेवंतीची लागवड केली जाते. गेल्या पाच, सहा वर्षापासून झेंडु, शेवंतीची आपल्या शेतातून लागवड केलेले शेतकरी स्वत:च फुलांची विक्री करणे पसंद करतात. येथील स्टेशन रस्ता,चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात तसेच भादुले चौक, अर्बंन बँक परिसर, नाथ चौक आदी परिसरात ही मंडळी स्वत:च आपण पिकविलेल्या झेंडु, शेवंती, गुलाब आदी मालाची ( फुलांची ) विक्री करताना दिसत होते. त्यामुळे येथील फुलबाजारावर त्याचा देखील परिणाम होत असल्याचे नेहमीच्या फुलविक्रेत्यां मंडळींकडून बोलले जात होते.
———————————
नेहमीच्या फुलविक्रेत्यांवर थेट विक्रीचा परिणाम
गेल्या पाच, सहा वर्षापासून स्वत: फुलांचे उत्पादन करीत असलेल्या शेतकऱ्यांकडून शहरात विविध ठिकाणी बसून थेट ग्राहकांना माल विक्रीची नवीन पध्दत सुरु झालेली दिसत आहे. त्यामुळे दलाल नसल्यामुळे थेट ग्राहकांना देखील कमी दरात फुले उपलब्ध होताना दिसत आहेत. या मुळे दररोज फुलांचे हार, फुले विक्री करणाऱ्यामंडळींवर ऐन सणात फारसा व्यवसाय होत नसल्यामुळे किंवा व्यवसायातील थेट स्पर्धेमुळे नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे या मंडळींकडून बोलले जात आहे.
——————
येथील बाजारात दिवाळी सणासुदीमुळे फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे.दिपावली सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फुलांची विक्री होत असते.
दादा माळी ( फुलांचे आडत व्यापारी )
———————————
या वर्षी तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पावसामुळे झेंडुचे मोठे नुकसान झाले. मात्र फुलांची लागवड यावर्षी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अपेक्षीत दर काही मिळाला नाही.
पिंटू जाधव ( फुल उत्पादक शेतकरी )
————————–
पंढरपूर येथील फुलांच्या बाजारा मध्ये दिवाळी सणा निमित्त मंगळवारी झेंडुसह विविध प्रकारच्या फुलांची मोठी आवक झालेली दिसत होती.