सोलापूर – “एक मराठा, लाख मराठा!” हे घोषवाक्य घेऊन मराठा आंदोलक राम जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मराठा समाजावर होणाऱ्या राजकीय अन्यायाचा तीव्र निषेध केला आहे.
सोलापूर महापौर निवडीत मराठा समाजाला वंचित ठरवण्यात आले असून, यासाठी जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. १९९३ नंतर ३२ वर्षांपासून मराठा समाज महापौर पदापासून वंचित राहिल्याचा उल्लेख करत त्यांनी या अन्यायाला विरोध केला आहे. “जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहील,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
राम जाधव यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या काही प्रमुख नेत्यांवर आरोप करत म्हटले की, ३ दशकांनी भाजपला मराठा समाजाचा महापौर करण्याची संधी होती, पण त्याच्यावर एक शब्दही न काढता, समाजाची उपेक्षा करण्यात आली. यापूर्वी ३ वेळा पद्मसाली समाजाला, २ वेळा मुस्लिम, लिंगायत, लमाण समाजाला आणि इतर समाजांना महापौर पदावर न्याय देण्यात आले. परंतु, मराठा समाज ३२ वर्षे या अधिकारापासून वंचित आहे, असे त्यांनी आरोप केले.
२०१६ मध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर आणि २०२५ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ७०० कोटी दिल्याबद्दल जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला होता. पण, त्याचवेळी सोलापूर महापालिकेतील मराठा समाजाचा महापौर होण्याची संधी भाजपने गमावली.
“आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, पण मराठा समाजावर झालेला हा अन्याय कधीच विसरणार नाही. पुढेही मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रात होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवत राहील,” अशी चेतावणी राम जाधव यांनी दिली आहे.
त्यांच्या या रक्ताने लिहिलेल्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे, आणि आगामी निवडणुकीतील वादग्रस्त मुद्दे पुन्हा एकदा उचलले आहेत.
























