जालना : जालना तालुक्यातील चितळी पुतळी फाटा येथे असलेल्या दिपक कृषी सेवा केंद्र या कृषी साहित्य विक्री दुकानाच्या गोदामाला आज दि. 20 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, कीटकनाशके तसेच विविध प्रकारची कृषी औषधे साठवून ठेवण्यात आली होती. पहाटे अचानक धूर निघत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ माहिती दिली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोदाम पेटून उठले. त्यामुळे गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
दुकानाचे मालक दिपक भुतेकर आणि आकाश भुतेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात आले. मात्र ज्वालांची तीव्रता मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता आले नाही. या आगीत अंदाजे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला खत व कीटकनाशकांचा साठा नष्ट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाने भेट देऊन पंचनामा केला असून, घटनेची पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


























