नांदेड / देगलूर : देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज देगलूर पोलिस स्टेशनतर्फे “रन फॉर युनिटी” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पुरुष गटातून लातुराचा निवृत्ती धुडेवाड तर महिला गटातून देगलूरची श्यामका पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावले आहे.
ही स्पर्धा नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तर देगलूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन देगलूरतर्फे आज शहरात घेण्यात आली. या स्पर्धेत लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील व तेलंगणा राज्यातील शेकडो धावपटूनीं सहभाग घेतला. या स्पर्धेतून सदभावना, एकात्मता, बंधुता, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला.
सदर स्पर्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते होट्टल फाटा आणि परत होट्टल फाटा ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या दरम्यान पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुरुष व महिला गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकास रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देण्यात आले.
या स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम निवृत्ती प्रल्हाद धुडेवाड रा. घरणी ता. चाकूर जि. लातूर, द्वितीय उमाकांत शिवाजी खोबरे रा. दगडगाव ता. लोहा जि. नांदेड, तृतीय महेश दत्ता देवकते रा. मांगझरी ता. अहमदपूर जि. लातूर, चतुर्थ हनुमंत अशोकराव पवार रा. हटक्याळ ता. कंधार जि. नांदेड तर महिला गटातून. प्रथम श्यामका सोपान राठोड भीमराव तांडा ता. देगलूर जि.नांदेड, द्वितीय सुप्रिया सुरेश सोनकांबळे रा. केसराळी ता. बिलोली जि.नांदेड, तृतीय अश्विनी नंदकुमार फिरंगे रा. बल्लूर ता. देगलूर जि. नांदेड, चतुर्थ मधु हनुमंतराव आडकुते रा. सुजायतपूर ता. देगलूर जिल्हा नांदेड यांनी पारितोषिके मिळवली आहेत. यासह चार उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, तहसीलदार भरत सुर्यवंशी, मुख्याधिकारी निलम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्रू देव पवार, उपनिरीक्षक नरहरी फड, गोपाळ सूर्यवंशी, महाजन म्हैसनवाड, किरण बेंबडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार ,पोलीस पाटील, गृह रक्षक दल,प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकेत गोसावी
पोलीस उप अधीक्षक
सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशात विविध उपक्रम राबविले जात आहेत. पोलीस दलातर्फे ‘रन फॉर युनिटी’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन घेण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेत विविध धावपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश देशात सदभावना, एकात्मता, बंधुता आणि अखंडता समाजात निर्माण करणे. तसेच तरुणाई मध्ये देशभक्तीची प्रेरणा जागृत करणे हा होता.
मारुती मुंडे
पोलीस निरीक्षक
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर पोलीस स्टेशनतर्फे साठे चौक ते होट्टल फाटा आणि परत होट्टल फाटा ते साठे चौक अशाप्रकारे पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला उजाळा मिळाला. आम्ही समाजात चांगला संदेश दिला असून येणाऱ्या काळात शहर व ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचा उपक्रम रावबणार आहोत.
स्पर्धक प्रथम विजेता
निवृत्ती प्रल्हाद धुडेवाड, लातूर
(प्रथम पारितोषिक विजेता – पुरुष गट)
मी गेल्या चार-पाच वर्षापासून पोलीस व आर्मी भरतीची तयारी करीत आहे. या स्पर्धेचे नियोजन अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आले. अशा स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहन मिळेल यातून उत्कृष्ट खेळाडू तयार होतील.
स्पर्धक
श्यामका सोपान पवार, देगलूर
(प्रथम पारितोषिक विजेती – महिला गट)
मी देगलूर पोलीस स्टेशन अंतर्गत गृहरक्षक दलात कार्य करीत असून गेल्या तीन चार वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. यापूर्वी मी नांदेड, वाशिम देगलूर अशा ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेत पारितोषिके मिळवली आहेत. आज देगलूर येथे मला प्रथम पारितोषिक मिळाले. परंतु स्पर्धेत केवळ बक्षीस मिळवणे हे महत्त्वाचे नाही तर सहभाग घेणे महत्त्वाचा आहे. या स्पर्धात मला काय शिकायला मिळते. यांचा विचार मी एक स्पर्धक म्हणून करते.


























