धाराशिव – केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षक व शिक्षणविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी देशातील सात प्रमुख शिक्षक संघटनांनी एकत्र येत अखिल भारतीय शिक्षक संघटना संयुक्त कृती समिती (AIJACTO)ची स्थापना केली आहे. शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नांवर देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी संसद भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिली.
शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात असून सरकारकडून या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. AIJACTOच्या वतीने RTE कायद्यापूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून सूट, जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापित करणे, NEP 2020 मधील शिक्षणविरोधी तरतुदी मागे घेणे, शाळांचे विलीनीकरण थांबवणे व रिक्त पदे तात्काळ भरणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे, कराराधीन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, समान कामासाठी समान वेतन आणि ८व्या केंद्रीय वेतन आयोगाची वेळेत अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
५ फेब्रुवारीच्या संसद मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे, व्ही. जी. पवार, अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, केंद्र कार्यकारिणी सदस्य एफ. जी. जमादार, सुशीलकुमार तीर्थकर, जिल्हाध्यक्ष जयपाल शेरखाने, जिल्हा कार्याध्यक्ष दयानंद भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष डी. एम. बनसोडे, जिल्हा सहसचिव गीते, धाराशिव शहराध्यक्ष व्यंकटेश पाटील व धाराशिव तालुकाध्यक्ष एस. के. दराडे यांनी केले आहे.
अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अण्णासाहेब कुरुलकर यांनी दिली.


















