सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’
मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘एक दूजे के वास्ते’ यांसारख्या आधुनिक प्रेमकहाण्या सादर करणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनी आता ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ मालिकेच्या रूपात एक आगळावेगळा आकर्षक रोमान्स घेऊन येत आहे. ही मालिका एक प्रभावी सुपरस्टार अयान ग्रोव्हर आणि एका छोट्या गावात राहणारी, एका चित्रपटगृहाची मालकीण असलेली शिवांगी सावंत यांच्यात जन्मलेली एक अनपेक्षित प्रेम कहाणी दाखवून प्रेम, नाट्य आणि कारस्थानाची वेधक कहाणी सांगणार आहे. अयान ग्रोव्हर आणि शिवांगी सावंत या दोघांचे विश्व अगदी वेगवेगळे आहे, पण एका झंजावाती रोमान्समध्ये ते सापडतात. सौरभ तिवारीच्या परीन मल्टीमीडिया द्वारे निर्मित ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 24 जून 2024 रोजी सुरू होट आहे आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता या मालिकेचे प्रसारण करण्यात येईल.
महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहणारी शिवांगी सावंत ही विनयशील मुलगी आणि लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला सुपरस्टार अयान ग्रोव्हर या लक्षवेधी कथानकाच्या केंद्रस्थानी आहेत. सिनेमावरील आत्यंतिक प्रेमामुळे शिवांगीला आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’ला भरभराटीचे दिवस पुन्हा मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची प्रेरणा मिळते. अयान ग्रोव्हरचा एखादा सुपरहिट सिनेमा संगम सिनेमाचे नशीब पालटून टाकेल असा तिचा विश्वास आहे. मुंबईत शिवांगी आणि अयान म्हणजे AG ची भेट होते. त्यांच्या अनपेक्षित भेटीतून एका झंजावाती रोमान्सचा अंकुर फुटतो आणि चित्रपट व्यवसायातील झगझगाटात तो फुलतो. या मालिकेत अयान ग्रोव्हरच्या भूमिकेत अभिषेक बजाज, शिवांगी सावंतच्या भूमिकेत खुशी दुबे, बॉबीच्या भूमिकेत आसावरी जोशी आणि मुकेश जाधवच्या रूपात संजय नार्वेकर दिसणार आहेत.
24 जून पासून सुरू होत असलेली ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
टिप्पण्या:
अभिषेक बजाज, अभिनेता
मोहक पण तितकेच गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असलेला अयान ग्रोव्हर साकार करण्याची संधी मला मिळाल्याचा आनंद आहे. एका सुपरस्टारच्या व्यक्तिमत्वातील नाना छटा अभिव्यक्त करण्यासाठी मला ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ मालिकेचा सुंदर कॅनव्हास मिळाला आहे. या भूमिकेमुळे प्रसिद्धीबरोबरच मला उत्कृष्टता साध्य करण्याचा ध्यास, अभिनय कलेवरचे प्रेम आणि प्रेक्षकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची संधीही मिळेल, जे जास्त महत्त्वाचे आहे.
खुशी दुबे, अभिनेत्री
एक विनयशील पण आधुनिक समज असलेली आणि अत्यंत दृढनिश्चयी शिवांगी सावंतची भूमिका जिवंत करणे हे मानाचे आणि तितकेच आव्हानात्मक आहे. शिवांगीचा प्रवास महाराष्ट्रातील छोट्या शहरातून मुंबईपर्यंतचा आहे. आणि या प्रवासामागचे प्रेरकबळ आहे, सिनेमाबद्दलचे तिचे प्रेम, आणि संगम सिनेमाला भरभराटीचे दिवस आणण्याचे तिच्या वडिलांचे स्वप्न. शिवांगीच्या कहाणीत अभिनयाबद्दल मला जे प्रेम आहे, त्या पॅशनचे प्रतिबिंब दिसते. मानवी मनातील आशा आणि त्याच्या स्वप्नांची ताकद शिवांगीच्या रूपात मूर्त रूप घेते. तिची कहाणी पडद्यावर जिवंत करताना मी रोमांचित झाले आहे.
आसावरी जोशी, अभिनेत्री
बॉबी ही प्रेमळ आणि कणखर व्यक्तिरेखा आहे. एक आई आणि तिच्या मुलीतील सखोल नात्याचा शोध घेण्याची संधी या भूमिकेने मला दिली आहे. आपल्या दिवंगत पतीचे ‘संगम सिनेमा’चे वैभव पुन्हा मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलीला ती देत असलेला भक्कम आधार या कथेला विशेष खोली बहाल करतो. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांना अबोलपणे मदत करत राहणाऱ्या असंख्य मातांचे प्रतिनिधित्व करणारी ही व्यक्तिरेखा आहे. ही इतकी मार्मिक भूमिका साकारण्यासाठी माझी निवड करण्यात आली, यात माझा सन्मान आहे. या प्रवासात प्रेक्षकांची साथ मला लाभेल अशी आशा आहे.
संजय नार्वेकर, अभिनेता
मुकेश जाधव एक आकर्षक व्यक्तिरेखा आहे. त्याच्यात सत्ता आणि नियंत्रण मिळवण्याची जबरदस्त हाव आहे. त्यासाठी चूक काय आणि बरोबर काय यांचा विचार तो करत नाही. ही भूमिका मला एका अशा माणसाच्या स्वभावातील जटिलतेचा शोध घेण्याचा वाव देते, ज्याची महत्त्वाकांक्षा अनिर्बंध आहे. कथानकातील ही महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, जी शिवांगीच्या प्रवासात तणाव आणि अडथळे उत्पन्न करते. या व्यक्तिरेखेमुळे आसपासच्या लोकांवर काय प्रभाव पडतो आणि या व्यक्तिरेखेतील बारकावे प्रेक्षकांना उलगडून दाखवण्यास मी उत्सुक आहे.