सोलापूर : विविध प्रश्न सोडविण्यासाठी सक्सेस पासवर्ड म्हणजे जयभीम आहे. विचार करणारी नवी पिढी घडवली पाहिजे. त्यासाठी ग्रंथ वाचणे गरजेचे आहे. लेखक दत्ता गायवाड यांचे चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकातून बाबासाहेबांचा सोलापूरशी असलेला संबंध, इतिहास जगापुढे आला आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी ज्या-ज्या गावात भेटी दिल्या, त्या “प्रत्येक गावागावातील बाबासाहेब” असे पुस्तक प्रकाशित व्हावे, असे प्रतिपादन संपादक संजय आवटे यांनी सोलापुरात केले.
ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड लिखित ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या ग्रंथाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात
थाटात झाले. या पुस्तकाचे प्रकाशन संपादक संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. एम. आर. कांबळे होते. विचारमंचावर लेखक दत्ता गायकवाड, अंबाजोगाई येथील प्रांताधिकारी दीपक वजाळे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव, निमंत्रक सुधीर चंदनशिवे आणि सुर्यमणी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय आवटे पुढे म्हणाले, दत्ता गायकवाड यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून ऐतिहासीक दस्तऐवजीकरण केले आहे. ते ही अगदी रंजकपणे, या पुस्तकाच्या आधारे चित्रपट देखील काढता येऊ शकतो. या स्थितीत आपण संशोधन करत, सप्रमाण महत्वाचा इतिहास लोकांसमोर घेऊन जायला हवा. आपल्यांना विचार करणारी पिढी घडवायची आहे. यासाठी नव्या पिढीने वाचायला हवे,
आपण म्हणतो नवी पिढी त्यांना काही कळत नाही. पण, आपण त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगत नाही. तुम्हाला बाबासाहेब नव्या पिढीला सांगायचे असतील तर त्यांच्या शैलीत सांगावे लागेल. चळवळीचे नेहमी दस्तऐवजीकरण करायला हवे. याचे महत्व इंग्रजांनी जाणले, म्हणू त्यांनी जगभर राज्य केले, असे प्रतिपादन आवटे यांनी केले.
प्रांताधिकारी दीपक वजाळे म्हणाले, महाकाश्यप यांच्या कार्याचा वारसा दत्ता गायकवाड यांनी या पुस्तक रूपाने चालवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्वाचे आहेत. ते सर्वांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक सुधीर चंदनशिवे यांनी केले. अध्यक्षीय मनोगत प्रा. एम. आर. कांबळे यांनी व्यक्त केले. लेखक दत्ता गायकवाड यांनी तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनामागील पार्श्वभूमी उलगडली. सूत्रसंचालन डॉ. अंजना गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुजित हावळे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




















