बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरात २२ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या जीवनदृष्टीला नवी दिशा देणारे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडले.
सकाळच्या सत्रात शेंद्रीय खाते, जलतारा प्रकल्प व शाश्वत शेती या विषयावर नानासाहेब कदम यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतातच विद्यार्थ्यांना सेंद्रिय खते कशी तयार करावीत याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन तेथील लागवड, पीक पद्धती व शेतीविषयक कामांची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी सांगितले की, शेंद्रीय शेतीमुळे मातीची सुपीकता वाढते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. तसेच जलतारा प्रकल्पामुळे पावसाचे पाणी साठवून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुपारच्या सत्रात ‘सोशल मीडियाचा अति वापर आणि त्याचे दुष्परिणाम’ या विषयावर डॉ. महेश देवकते (मनोसोपचार तज्ज्ञ) यांचे प्रभावी व विचारप्रवर्तक व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी. व्ही. लिंगे उपस्थित होते.
डॉ. देवकते सरांनी मोबाईल व सोशल मीडियाच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर होणारे परिणाम, लहान मुलांच्या मेंदूवर होणारे दुष्परिणाम आणि नकारात्मक विचारसरणी कशी वाढते हे विविध उदाहरणांतून अत्यंत प्रभावीपणे मांडले. ‘तंत्रज्ञानाचा वापर करा, पण त्याच्या आहारी जाऊ नका,’ असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुल यादव व अंजली राऊत यांनी केले. प्रीती चांदणे हिने पाहुण्यांचा परिचय करुन दिला, नेहा हाके हिने प्रस्तावना तर साईराज लांडगे याने आभार प्रदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, डॉ. के. एम. माळी, कासारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बडे सर, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या कनिष्ठ विभागातील शिक्षक, कर्मचारी तसेच सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























