वैराग – कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपल्यास एखाद्याचे प्राण कसे वाचवता येतात, याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे येथे आला आहे. शाळेतून घरी जात असताना अचानक चक्कर येऊन पडलेल्या पाचवीतील विद्यार्थिनीला वेळेवर मदत मिळवून दिल्याने तिचे प्राण वाचले आहेत. या कामगिरीबद्दल ग्रामविकास अधिकारी सौ. विजयलक्ष्मी पवार आणि अंगणवाडी सेविका सुशीला सोनवणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे गोरमाळे येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ५ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी अदिती गोपीनाथ भुसारे ही दुपारी सुट्टीच्या वेळी घरी जात होती. ‘पोस्ट चौकात’ पोहचली असता, तिचा रक्तदाब (BP) अचानक कमी झाल्याने तिला अंधारी आली आणि ती जागीच बेशुद्ध पडली.
भररस्त्यात मुलगी बेशुद्ध पडल्याचे पाहून परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्याचवेळी तेथून जात असलेल्या गोरमाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सौ. विजयलक्ष्मी पवार यांनी प्रसंगावधान राखले.
मुलगी बेशुद्ध असल्याचे लक्षात येताच ग्रामसेविका विजयालक्ष्मी पवार आणि उपस्थित अंगणवाडी सेविका सुशीला सोनवणे यांनी धाव घेतली. त्यांनी वेळ न घालवता तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला फोन करून पाचारण केले. रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांनी मुलीला धीर दिला आणि प्रथमोपचार मिळवून दिले. रुग्णवाहिका आल्यानंतर मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा रक्तदाब खूपच कमी झाला होता. जर तिला वेळेवर रुग्णालयात पोहोचवले नसते, तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. ग्रामविकास अधिकारी सौ. पवार आणि अंगणवाडी सेविका सुशीला सोनवणे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अदितीचे प्राण वाचले आहेत.
शासकीय कर्तव्य बजावत असतानाच एका मुलीचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल गोरमाळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. “मॅडमने केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने जे कार्य केले, ते आदर्शवत आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.


















