सोलापूर – बाळे येथील आकाश नगरचे परिसरातील एमएसीबीच्या लाईन वायरवर साप चढून बसला होता याची माहिती वाईल्ड लाइफ कंजर्वेशन असोसिएशन सोलापूरचे सदस्य सोमा डोके यांना मिळताच तातडीने घटनास्थळी जाऊन तो साप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आला .
गुरूवारी 13 नोव्हेंबर 2025 गुरुवार रात्री 7.30 वा. बाळे येथील आकाश नगरचे रहिवासी विनय गोवर्धनकर यांनी घरासमोरील लाईन वायरवर एक साप चढून बसला आहे व त्याला रेस्क्यू करावे असे WCAS चे सदस्य सोमा डोके यांनी फोनवरून माहिती दिली.

ही माहिती मिळताच सोमा डोके व रोहित गावडे हे दोघेजण आकाश नगरला घटनास्थळी गेले. दहा ते पंधरा मिनिटात घटनास्थळी पोहोचले. तिथे पाहणी केली असता MSEB च्या लाईन वायरवर एक विरोळा जातीचा बिनविषारी साप चढून बसला असल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून दोघेही अचंबित झाले. कारण साप हा भिंतीवर, झाडावर अथवा वायरवर चढल्याचे आजपर्यंत कधीच पाहण्यात आले नव्हते त्यामुळे लोकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. डोके यांनी लाईन वायर समोरील गॅलरीवर चढून एका पोत्यामध्ये त्या सापाला अलगद पकडले आणि तिथे जमलेल्या लोकांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर तेथील जमलेल्या नागरिकांना त्या सापाबद्दल अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सुखरूपपणे सोडून देण्यात आले.


















